सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळेगाव : माळेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत मिनीबस चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. विशेष म्हणजे चोरीच्या या प्रकारामागे मिनीबसचाच चालक असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्याला अटक करून ७ लाख रुपये किमतीची मिनीबस जप्त केली आहे. माळेगाव परिसरात अलीकडेच चोरीच्या घटना वाढू लागल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गस्त वाढवून तपास यंत्रणा अधिक सक्रिय केली होती.
चौकशीनंतर चोरीची कबुली
२८ ऑगस्टच्या रात्री माळेगाव येथील राजहंस चौकाजवळील शनी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली फोर्स मोटर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस (पांढरा रंग) चोरीला गेल्याची तक्रार वाहनमालक सचिन बाबसो कोकरे यांनी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. चोरी झालेल्या मिनीबसची किंमत सुमारे ७ लाख रुपये इतकी आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून पोलिसांच्या संशयाची दिशा थेट मिनीबसच्या चालकाकडे वळली. पोलिसांनी चालक प्रदीप रामचंद्र शिंदे (रा. कऱ्हावागज, ता. बारामती) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांच्या अधिक चौकशीनंतर त्याने चोरीची कबुली दिली.
या पथकाने केली कारवाई
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली मिनीबस हस्तगत केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल पांढरे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे आणि अमोल वाघमारे यांनी विशेष योगदान दिले.