अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा 'विजयी जल्लोष
Maratha Reservation Protest: गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आज मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदय सामंत आणि जयकुमार गोरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
यावेळी, सरकारने मराठा समाजासाठी तयार केलेला शासन निर्णयाचा मसुदा वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर, अभ्यासक आणि समितीमधील चर्चेनंतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाने मोठा आनंदोत्सव साजरा केला.
मराठा समाजाच्या मागणीला यश मिळाल्याचे कळताच अहिल्यानगर शहरातही सकल मराठा समाजातर्फे मोठा जल्लोष करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी, गुलाल उधळून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हा विजय केवळ आरक्षणाचा नसून, मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि संघर्षाचाही आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाच्या हिताचा तोडगा काढला आहे. त्यामुळे जे काही उपोषण सुरू होते ते आता संपवण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आमची सुरुवातीपासून तयारी होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांची सरसकट ही जी मागणी होती ती, त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता सरसकट करणे शक्य नव्हते.
जीआर निघाला आहे. तसेच अन्य मागण्या देखील मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी अभ्यास करून चर्चा करून मार्ग काढला आहे. आम्ही यावर सांविधानिक तोडगा काढू शकलो आहोत, जो कोर्टात देखील टिकेल. मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी उत्तम कामे केले आहे. यामध्ये मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.
मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळी केल्या आहेत. ते एक संवेदनशील व्यक्ती असून, त्यांच्या या चळवळीला आज यश आले आहे.”
मुंबईत आलेल्या सर्व मराठा समाजातील बंधू-भगिनींचेही मी आभार मानतो. आंदोलन आता संपले आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्यांना सकारात्मक आणि व्यावहारिक प्रतिसाद दिला आहे…”