वनराज आंदेकर(फोटो-सोशल मीडिया)
पुणे/अक्षय फाटक : पोलिसांच्या सतर्कतेने वनराज आंदेकर खून प्रकरण “खून का बदला खून से”चा डाव उधळला गेला अन् सूत्रधार अज्ञात वासात गायब झाले असले तरी एक पाऊल पोलिसांनी यशस्वीरित्या टाकत सूत्रधारांना शस्त्रसाठा पुरविणाऱ्या सराईताला बेड्या ठोकल्या आहेत. तर टेहाळणी (वॉच) करणाऱ्या दुसऱ्याकडून आणखी काही मिळते का, त्यांचा ठावठिकाणा लागतो का, याची चाचपणी सुरू केली आहे. परंतु, अद्याप तरी अज्ञात वासातील सापडू शकले नसल्याने या टोळ्यांमधील मोठ्या संघर्षाचे सावट उभे राहिले आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गेम करण्याची पुर्ण तयारीकरून रचण्यात आलेला डाव पुणे पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणात आता पोलिसांनी भारती विद्यापीठ तसेच समर्थ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील टोळ्यांचा पॅटर्न पाहता बहुतेकवेळा ‘बदला’ घेण्याच्या हेतूने शस्त्रसाठा जमा केला जातो. टोळीतील एका विशिष्ट व्यक्तींवर (त्यातील महत्वाचा) लक्ष ठेवले जाते. आंदेकर प्रकरणातही हाच पॅटर्न समोर आला आहे. मात्र, गुप्त माहितीवरून पोलिसांनी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या सराईताला गजाआड करून या साखळीला तात्पुरता ब्रेक लावला आहे. मात्र, तो किती दिवस राहिल हा प्रश्न आहे.
हेही वाचा : Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन
गेल्या वर्षभरात आंदेकर खून प्रकरणानंतर गुन्हे शाखेने शस्त्रास्त्र जप्ती, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व अटकसत्र अशा कारवाया सुरू ठेवल्या. शेकडो कारतूस, देशी पिस्तुले व तलवारी जप्त करून टोळ्यांच्या शक्तीला आळा बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीसुद्धा, आंदेकर खून हा शहरातील गँगवारच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट मानला जातो. सध्या पोलिसांचा मुख्य भर अज्ञात वासातील सूत्रधारांचा ठावठिकाणा लावण्यावर आहे. त्यांच्या हालचाली उघडकीस आल्यास आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा टळला असला तरी, टोळ्यांच्या सावटाने शहरातील शांततेची परीक्षा अद्याप सुरूच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अज्ञात वासातील टोळीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असून, इतिहासात असा बदला झाला नसेल तशा पद्धतीने तो घेतला जाईल असे सांगितले जाते.
गुन्हे शाखेने वॉच ठेवणाऱ्याला पकडून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यांना शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एकाला पकडले आहे. त्याच्यावर समर्थ पोलिसांत आर्म अॅक्टचा गुन्हा नोंदवून एक पिस्तूल देखील जप्त केले आहे. पण, पुर्व रेकॉर्ड पाहता तो वानवडी, कोंढवा या पोलिस ठाण्यातील गुन्हेगार आहे. माहितीनुसार, तो या भागातील एका टोळीशी संबंधित आहे, अशीही माहिती समोर येत असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडून आता इतर माहिती गोळा केली जात आहे.
हेही वाचा : पुणेकरांना दिलासा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीतून…
पोलिसांनी वॉच ठेवणाऱ्या तरुणाला पकडल्यानंतर चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, त्याच्याकडे आता कसून चौकशी सुरू आहे. दोघांचा तपास करून अज्ञात वासात गायब झालेल्यांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे.