Photo Credit : Social Media
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केले आहे. आताही त्यांची आग्रही मागणी आहे. असे असताना आता आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार द्यायचे की निवडक जागांवर उमेदवार पाडण्यासाठी जोर लावायचा याबाबत आज निर्णय घेण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहिला मिळाले आहे. त्यात आता त्यांनी म्हटले की, ‘जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल, हक्काचे आरक्षण द्यायचे नाही ठरवले असेल तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. ज्या क्षेत्रात आम्हाला जायचे नाही, पण तिथे जायची वेळ सत्ताधारी विरोधकांनी आमच्यावर आणली’.
तसेच गर्वाला कधी वाढ नसते, कधी ना कधी संपतोच. लोकसभेला जे झाले त्यापेक्षा ५ पटीने विधानसभेत होईल. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व सरकारला आला आहे. मराठा कुणबी एकच आहे, मराठ्यांवर जाणुनबुजून अन्याय करत आहात. सारथीच्या कोणत्या सवलती आम्हाला कामी येतात, सगळ्या मुलींना मोफत शिक्षण मग फी का घेतली, मी पावत्या देतो. प्रवेशासाठी पैसे घेताय. त्यामुळे सरकारवर सर्व समाजातील लोक नाराज होऊ लागलीत असे त्यांनी म्हटले.
सर्वांना आरक्षण द्या
मराठ्यांचे कल्याण व्हावे, तसे लिंगायत, धनगर, मुस्लिम समाजालाही मिळायला हवे ही प्रामाणिकपणाची भावना आहे. बारा बलुतेदारांची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. परिणाम काहीही झाले सर्व जातीधर्माला आरक्षण दिले पाहिजे. वेळ पडली तर सगळ्यांना एकत्र येत विधानसभेत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
– मनोज जरांगे, मराठा नेते