पंचवटी : नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik Police) हद्दीतील पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदलीचे आदेश काढले आहे. यामध्ये नियंत्रण कक्षामधील (Control Room) अनेक नव्याने बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यांची जबाबदारी देत त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक सराईत गुन्हेगारांना हजेरी तसेच अनेकांना शहरातून तडीपार करून देखील घरफोडी, चेन स्नेचिंग, हाणामाऱ्या, मोबाईल चोरी, वाहन चोरी, हत्यारांचा सर्रास वापर अशा गुन्ह्यांचा आलेख वाढताच राहिल्याने आणि शहरात अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असताना देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरूच असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी थेट पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. यामागे शहरात गुन्हेगारी वाढल्याची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली
नितीन केशव जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा (सहाय्यक पोलीस आयुक्त, पंचवटी) : सचिन दिलीप बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा (सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा / अति. कार्यभार विशेष शाखा); शेखर पोपट देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग (सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग): सीताराम शंकर कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा): सोमनाथ द्वारकानाथ तांबे, नियंत्रण कक्ष (सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन).