सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पलटवार केला आहे. अमित शाह यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना पवार यांनी शाह यांच्या तडीपारीचा उल्लेख केला. ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे. यावरून आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“शरद पवार हे वैफायल्यातून टीका करत आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते असूनही अशी टीका करतात. शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपीला विमानातून आणलं होतं. यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही,” असा सवाल विचारात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या काळात एकही काम केलं नाही. मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी काय केलं? त्यांनी याबद्दल सांगावं. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची. त्यांचा हा धंदा लोकांनी पहिला आहे, अशी टीकाही विखे पाटील यांनी शरद पवारांवर केली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कांदा निर्यातीबद्दलही वक्तव्य केले. निर्यात मूल्य कमी झाले पाहिजे असा एक वर्ग असून कांदा व्यापाऱ्यांना त्यांनी शेतकाऱ्यांना वेठीस धरलं आहे. निर्यात मूल्य कमी होऊन अधिक कांदा निर्यात झाला पाहिजे. यासाठी पियुष गोयल यांना विनंती केली आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.