(फोटो- टीम नवराष्ट्र)
Marathi Breaking news live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात जबरी चोरी झाली. चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ५१ तोळे सोने आणि दोन किलो चांदी लुटली. या सर्व सहा आरोपींना नगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून सुमारे २६ लाख रुपये किमतीचे जवळपास सर्व दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. चोरी केलेले दागिने अहिल्यानगर येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना लोणी कोल्हार मार्गावर पोलिसांनी कारसह त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी संगमनेरसह आणखी काही ठिकाणच्या मंदिरात चोऱ्या केल्या असल्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आठवडाभराच्या आतच या जबरी चोरीचा छडा लावत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
14 Mar 2025 06:50 PM (IST)
देशभरासह राज्यात होळीचा सण साजरा केला जात आहे. दरम्यान आज धुळवड साजरी केली जात असताना बदलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे . बदलापुरातील चार मुलांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही बुडाल्याचं सांगिंतलं जात आहे. आर्यन मेदर(१५), आर्यन सिंग (१६), सिद्धार्थ सिंग (१६), ओमसिंग तोमर (१५) अशी मृत मुलांची नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.
14 Mar 2025 06:31 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांवरून मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम अधिकारी आणि सैनिक नव्हते, असा दावा त्यांनी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते. नितेश राणेंनी इतिहास वाचावा असा सल्ला दिला होता. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी दर एक्सवर शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सरदारांची संपूर्ण यादीच पोस्ट केली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता पुस्तकातही मुस्लिम सरदारांचा उल्लेख आहे.
14 Mar 2025 06:15 PM (IST)
मी नाराज वगैरे काहीही नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, माध्यमांनी मला विनाकारण ढकलायचे, चालवलेले दिसतेय , असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमंशी बोलताना दिले. जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
14 Mar 2025 05:08 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहारच्या राजकारणात वाढत्या हालचालींमुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये अमित शहा म्हणाले होते की, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल हे संसदीय मंडळ ठरवेल. त्यानंतर आता बिहारमध्ये निवडणुका जवळ आल्यामुळे ते लवकरच बिहारमध्ये तळ ठोकणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच शहा यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानाबद्दल कोणतीही कुजबुज नव्हती. बिहारमधील एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडीयूच्या नेत्यांनाही भाजपच्या मनात काय चालले आहे हे समजत नसल्याचे दिसत आहे.
14 Mar 2025 04:09 PM (IST)
बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय २६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. देसाई यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावर पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे.
14 Mar 2025 03:39 PM (IST)
मागील आठवड्यामध्ये रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राज्यमंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर इतर महिलांची काय व्यथा असेल अशी टीका करण्यात येत होती. या प्रकरणावरुन टीका करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, “त्या घटनेला १० दिवस उलटले आहेत. तरीदेखील या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते शोधायला हवं. कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार राहू शकले.” असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
14 Mar 2025 03:38 PM (IST)
जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, तोपर्यंत खाली कोणी हालणार नाही. कारण ईडीचे जे फटके आहेत, त्याची या सर्वांनाच भीती आहे, त्यामुळे काँग्रेसची ऑफर स्वीकारण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा चिमटा बच्चू कडू यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
14 Mar 2025 03:35 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आज बारामतीत आहे. त्यांच्या नाराजीच्या चर्चेवर त्यांनी आज शरद पवारांचीही भेट घेतली. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी पाटील यांनी नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलेल्याचा रेफरन्स बघा. राजू शेट्टींना बोलताना मी आंदोलनाच्या अनुषंगाने विधान केले होते, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
14 Mar 2025 03:10 PM (IST)
राज्यभरामध्ये धुळवडीचा मोठ्या उत्साहामध्ये सण साजरा केला जात आहे. मौजमजेत गाण्यांच्या तालावर ठेका धरून झाल्यानंतर दुपारच्या वेळेत जेवणासाठी खास सोय करण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटेपासून कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांनी सकाळ, दुपारनंतर मटण मिळते की नाही या भीतीने मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर रांगा लावल्या होत्या.
14 Mar 2025 02:35 PM (IST)
यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे 13वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी 22 आणि 23 मार्चला होईल. संत तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर संमेलनाध्यक्ष असतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संमेलनाला उपस्थित राहतील.
14 Mar 2025 01:53 PM (IST)
“उद्धव ठाकरेंनी दररोज सभागृहात यावं तर संजय राऊतांनी त्यांचा सकाळचा शिमगा वर्षभरासाठी बंद करावा”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरखळी लगावली आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला.
14 Mar 2025 01:20 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लग्नसोहळा पार पडणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. येत्या 10 एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. यापूर्वी त्यांनी आजोबा शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशिर्वाद घेतले आहेत.
14 Mar 2025 01:03 PM (IST)
पुण्यात मध्यरात्री वारजे, गणपती माथा येथे एका लाकडी सामान असलेल्या गोडाऊनला आग लागली. तर धायरी पारी कंपनीलगत असलेल्या कचरा प्रकल्पास देखील मोठी आग.लागली होती. होळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती.
14 Mar 2025 12:40 PM (IST)
पुण्यातील तळजाई टेकडीवर रंगांची उधळण करत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार भीमराव तापकीर यांनी धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले.
14 Mar 2025 12:36 PM (IST)
पालघर येथील विरार भागात एका सूटकेसमध्ये एका महिलेचे कापलेले मुंडके आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
14 Mar 2025 12:14 PM (IST)
पुण्यामध्ये पहाटे आगीची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पहाटे चारच्या सुमारास शनिवारवाडा येथे एका चारचाकी वाहनाला आग लागली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आली असून यामध्ये कोणीही जखमी नाही.
14 Mar 2025 11:50 AM (IST)
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगजेब याला गाडल्यावर चारशे वर्ष झाली विसरून जावा. शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहे ते औरंगजेबमुळे आत्महत्या करत आहेत का तो तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे. औरंगजेबने अन्याय आणि अत्याचार केला असेल तर तुम्ही लोकं काय करत आहात शेतकरी मरत आहे औरंगजेब यांच्या कार्यकाळ झाला आहे ते झालं पण तुमच्या कार्यकाळ हा औरंगजेबापेक्षा देखील खूप खराब आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
14 Mar 2025 11:12 AM (IST)
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. आज त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून कडेकोट बंदोबस्तात त्याला बीडमध्ये आणण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, त्यानंतर त्याला शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात हजर केले जाईल. त्याआधी शिरूर पोलीस ठाण्यात त्याची ओळख परेड होणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला उपजिल्हा रुग्णालय, शिरूर कासार येथे नेण्यात येणार असून, त्यानंतर न्यायालयात हजर केले जाईल.
14 Mar 2025 11:11 AM (IST)
पुणेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये देखील धुलिवंदन सणाचा उत्साह दिसून आहे. धुलिवंदनाच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला आहे. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
14 Mar 2025 11:10 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा तिथीप्रमाणे येत्या 17 मार्च रोजी राज्यभरामध्ये साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण देखील केले जाणार आहे. सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून तब्बल सात वर्षांच्या प्रयत्नातून हे विशाल मंदिर साकारले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा चार दिवसाच्या शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठपणा सोहळ्याच्या धार्मिक विधीनुसार होणार आहे.