कल्याण : कोलकातामध्ये झालेल्या घटनेनंतर देशामध्ये डॉक्टर असो किंवा सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात संतापले आहेत. त्याचबरोबर सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर कोलकाता सरकारवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संतापलेल्या कोलकातामधील डॉक्टरांनी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या आंदोलनात कल्याणमधील डॉक्टरांच्या आयएमएसह, आयडीए, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याण होमीओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फीजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडीयन मेडीकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तत्पूर्वी आयएमए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोवीड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली.
हेदेखील वाचा – कोलकातामध्ये आणखी एका मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न! तीन भामट्याना नागरिकांनी घेतलं ताब्यात
तर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केले जाते, आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिले पाहिजे, लोकांबरोबर उभे राहणेही गरजेचे आहे, आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे अशा प्रकारची मतेही यावेळी डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांना देण्यात आले.
यावेळी आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर, निमा अध्यक्ष डॉ. शाम पोटदुखे, महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉ.विपुल कक्कड, आयडीएचे पवन यालगी, केम्पाचे डॉ. नीरज पाल, आयएसएचे डॉ. प्रकाश देशमुख, कल्याण फार्मसिस्टचे गणेश शेळके, केएचडीएफचे डॉ. राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती. ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्याही लक्षणीय होती.