Sushil Kumar Shinde-Narsayya Adam
सोलापूर : भारतात लोकशाही आणि समाजवादाची मूल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हितासाठी आग्रही राहिले आहे. 2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीत सोडून निवडून आणले. त्यानंतर आता माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कॉ. नरसय्या आडम यांच्यात सदिच्छा भेट झाली. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या निवडून आल्या आहेत. त्यानुसार, त्या सोलापूरच्या खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. तेव्हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व 2004 सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल, असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.
दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवास्थानी बुधवारी (दि.10) सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना पाठिंबा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या प्रणिती शिंदे यांना आडम मास्तर यांनी पाठिंबा दिला होता. आडम मास्तर यांनी यापूर्वी सलग तीनवेळा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा स्वतःला मिळण्यासाठी नरसय्या आडम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शब्द घेतल्याचा दावा केला आहे.