जीबीएस अपडेट सातारा (फोटो -सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
सातारा: जीबीएस आजाराचे रुग्ण आढळत असून या आजाराच्या अनुषंगाने सर्व आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांनी अलर्ट राहून उपायोजना कराव्यात. हा आजार दुषीत अन्न व पाण्यामुळे होत असल्याने पाण्याचे नमुने सातत्याने तपसावेत. सार्वजनिक उद्भवातून दुषीत पाणीपुरवठा होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरसा औषधसाठा ठेवावा, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी दिवस-रात्र उपलब्ध रहाणे अनिवार्य असून रुग्णांच्या उपचारात कोणत्याही पद्धतीची हलगर्जी सहन केली जाणार नाही, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जीबीएस आजाराबाबत पालकमंत्री देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.
जीबीएस आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील रुग्णस्थिती, करण्यात येणाऱ्या उपायोजना यांचा आढावा घेतला. जीबीएस आजाराच्या उपायोजनांबरोबरच प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत. या आजाराचा उद्भव प्रामुख्याने दुषीत पाणी व दुषीत अन्न यामाध्यमातून होत असल्याने दररोज, ग्रामीण व शहरी भागातील पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत.
प्रत्येक ग्रामपचायत, नगर पालिकेत पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक क्लोरीन पुरवठा ठेवावा. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये जीबीएसच्या रुग्णांना प्राधान्याने त्वरीत उपचार मिळावेत, यासाठी बेड राखीव ठेवावेत. योग्य औषधोपचाराने हा आजार बरा होणार असून याबाबत भितीचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी मात्र दुषीत अन्न व पाणी टाळावे. आजाराबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवूनये व नागरिकांनी आजारा बाबत घाबरुन जावू नये, असे आवाहनही पालकमंत्री साई यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी सध्या जिल्ह्यात या आजाराचे ७ रुग्ण असून या पैकी एका रुग्णावर ससून रुग्णालय, पुणे, एका रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्र दिघंची ता. आटपाडी जि.सांगली, एका रुग्णावर कृष्णा हॉस्पीटल कराड, एक रुग्ण स्व. क्रांतिसिंहनाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सुरु आहेत. तीन रुग्ण बरे हाऊन घरी गेले आहेत, असे सांगितले.
बेड राखीव ठेवण्याच्या सूचना
जीबीएस आजाराबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ३० लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. स्व. क्रांतिसिंहनाना पाटील रुग्णालयात १० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आजाराबाबत करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहेत. नागरिकांनी जीबीएस आजाराचे लक्षणे आढळल्या त्यांनी त्वरीत तपासणी करुन सातारा येथील स्व. क्रांतिसिंहनाना पाटील रुग्णालयात दाखल व्हावे, या आजार असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
हेही वाचा: मोठी बातमी ! GBS च्या संसर्गाचे खरं कारण आलं समोर; NIV च्या अहवालातून ‘ही’ माहिती स्पष्ट
जीबीएस आजार का होतो?
जीबीएस हा एक ऑटोइम्यून आजार आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच नसांवर हल्ला करते. सहसा हा आजार होण्यापूर्वी १ ते ६ आठवड्यांमध्ये एखादे पोटाचे किंवा श्वसनसंस्थेचे इन्फेक्शन होते आणि ते झाल्यानंतर ज्या अँटीबॉडी तयार होतात, त्यातील काही नसांच्या विरुद्ध देखील हल्ला करू लागतात. या हल्ल्यामुळे नर्व्हच्या भोवती असलेलं ‘मायलीन शिथ’ नष्ट होते. ज्यामुळे विविध स्नायुपर्यंत नर्व्ह संदेश देण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्नायू काम करेनासे होतात म्हणजेच शरीराला लकवा मारल्यासारखे चित्र दिसते.
जीबीएस सिंड्रोमची लक्षणे
जीबीएसची लक्षणं हळूहळू वाढत जाणारी असतात आणि सामान्यतः शरीराच्या खालच्या भागापासून (पाय) वरच्या भागाकडे (हात आणि चेहरा) पसरतात.
सुरुवातीची लक्षणे : दोन्ही पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे. पायातून चपला निसटून जाणे, हलकी वेदना किंवा अस्वस्थता. (मुलांमध्ये आढळ शकते) हाता पायांमध्ये जडपणा किंवा जाणीव कमी होणे. लक्षणे कमी न होता एक-दोन दिवसांमध्ये त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. ही लक्षणे अगदी साधी असल्याने यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.