फोटो- सोशल मीडिया
पुणे : शहरात ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (GBS) हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यामुळे बाधितग्रस्त भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
हेदेखील वाचा : Shirdi Saibaba Temple : शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान अॅक्शन मोडवर ; निर्णयाची अंमलबजावणी उद्याच होणार
गेल्या महिन्याभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी , नांदोशी आदी परिसरात जीबीएस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा आजार दूषित पाण्यामुळे, अन्नामुळे होत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. महापालिकेकडून या भागातील पाण्याचे स्त्रोत, खासगी टॅंकर व्यावसायिक, आरओ प्लांट व्यावसायिक आदी ठिकाणी पाण्याचे नमूने घेतले गेले.
तसेच या भागातील मांस विक्रेत्यांकडून नमूने घेतले गेले. आजाराची बाधा झालेल्या रुग्णांचे शौच, लघवी, रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदर नमूने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीनंतर एनआयव्हीकडून अहवाल आणि महापालिकेला काही सूचना देण्यात आल्या.
याविषयी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट होत असून, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील तो होऊ शकतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेने या भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी इतक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्यात हे केंद्र उभे केले जाईल. तसेच एनआयव्हीकडून पाण्यांचे नमूने घेताना ते दोन लिटर इतके घ्यावेत, तसेच ते दोन महिने साठवून ठेवून त्याची पुन्हा तपासणी करावी अशा सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून नमूने पाठविण्यासंदर्भात सहकार्य केले जात नसल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे. ’’
– पुणे शहरात आजपर्यंत १२० संशयित रुग्ण आढळून आले, हिंगणे खुर्द येथे आणखी एका रुग्णाची नव्याने नाेंद झाली.
– शहरातील ४१ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात आले आहे.
– रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यासाठी सर्व रुग्णालयात एक समुपदेशक नियुक्त करण्यास सुुरुवात केली गेली.
– आजारातून बरे झालेल्या रुग्णांना फिजीओथेरपी देण्यासाठी कमला नेहरू रुग्णालय, स्व.राजीव गांधी रुग्णालय, साेनावणे रुग्णालय येथे फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे.
हेदेखील वाचा : “अनैतिक धंदे चालू आहेत मटका , जुगार ,दारु तुमच्याच ताफ्यात असतात”; माजी आमदार परशुराम उपरकरांचा नितेश राणेंवर घणाघात