मुंबई – भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याकरीता केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर करत असून, विरोधकांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. कोर्टाने खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळीशी काहीही संबंध नाही तरी त्यांना गोवण्यात आले. नेत्यांना ठरवून टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. ईडी कारवाई झपाट्याने करते मात्र तपासात दिरंगाई करते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नावे टाकण्यात आली जेणेकरून त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी अशी चार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी ही नावे टाकली का असा सवालही कोर्टाने केला असल्याचे महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले.
[read_also content=”नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा, छगन भुजबळांची राज्य सरकारकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/start-government-medical-college-in-nashik-chhagan-bhujbal-demand-to-state-government-343357.html”]
दरम्यान, गुजरातमध्ये भाजपच्या आमदाराला एका केसमध्ये गुजरात हायकोर्टाने विरोधात निकाल दिला असताना, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे, याकडेही महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजप करत आहे का? याचे उत्तर द्यावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.