मुंबई – आमदार संजय शिरसाट यांना आज शुक्रवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर हृदयविकाराचे उपचार सुरू होते. शिरसाटांना औरंगाबादमध्ये हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे सिग्मा रुग्णालयात उपचार करून त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आमदार शिरसाटांना सोमवारी, १७ ऑक्टोबर रोजी रात्री हृदयाचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे डॉक्टर उन्मेष टाकळकर आणि त्यांच्या टीमने उपचार केले. त्यानंतर शिरसाट यांना पुढील उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लीलावती रुग्णालयात डॉक्टर गोखले आणि राव यांच्या टीमने अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्यांना चार दिवस लीलावतीमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले गेले. अखेर त्यांना आठवडाभर आराम घरी आराम करण्याचा सल्ला देत डॉक्टरांनी घरी जाण्यास परवानगी दिली आहे.
आमदार संजय शिरसाट यांची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. मात्र, नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी मध्यंतरी तसे एक ट्विटही केले होते. मात्र, ते ट्विट त्यांनी डिलिट केले. ते चुकून केले गेले, अशी सारवासरावही केली होती.