हेदुटणे, उत्तराशीव मधील जमीन हस्तांतरणास मनसेचा विरोध
गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशीव व हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जमिनीची मोजणी देखील केली जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे. गुरचरण जागेत गावकऱ्यांसाठी रुग्णालय, क्रीडा संकुल आणि गार्डन उभारण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरु आहे, अशी भुमिका मांडत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली आहे.
हेदेखील वाचा- महिलेचे केस ओढणं किंवा तिला ढकलणं विनयभंग….,मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
कल्याण ग्रामीण भागातील हेदुटणे व उत्तरशीव येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाव्दारे केला जात आहे. ही जमीन ग्रामस्थांनी राखून ठेवली होती, मात्र आता आता अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे. आदेश मिळाल्यानंतर तहसीलदारांनी पोलीस फौज फाटा घेऊन गावांमध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला आणि कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी प्रयत्न केले.
राजू पाटील यांचा जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सर्व प्रकारानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिलाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भुमिपुत्रांना दिले आणि संयम बाळगण्याची विनंती केली. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरु असल्याने नाराजी व्यक्त केली.
हेदेखील वाचा- मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली; पवना धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ
राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, आमचा गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घर मिळावीत अशी इच्छा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील कल्याण तालुक्यातील खोणी, शिरढोण आणि ठाणे तालुक्यातील भंडार्ली, गोठेघर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. तसेच एमएमआरडीए व खासगी विकासकांकडून प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांसाठी पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, गार्डन, खेळाचे मैदान आरक्षित नाहीत. त्यामुळे प्रथम रस्ते, पाणी, सुसज्ज रुग्णालयं, गार्डन यांसारख्या सुविधांसाठी येथील शासकीय जागा आरक्षित कराव्या, त्यानंतर गृहप्रकल्पांना परवानगी द्यावी.
कल्याण ग्रामीण भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय जागा स्थानिकांसाठी रुग्णालये, खेळाची मैदान, यांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे गृहसंकुल प्रकल्पांसाठी जागा देताना सोयी – सुविधांचा विचार करणे आवश्यक होते. मात्र तरिही कोणत्याही प्रकारचा विचार न करता हा प्रकल्प सुरु करण्यात आला. या प्रकरणी आता मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री, जिल्हाधिकारी व म्हाडाचे लक्ष वेधले आहे.