MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; मुख्य परीक्षा 5 ते 9 मे तर निकाल...
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा यासारख्या विविध परीक्षांच्या व निकालाच्या अंदाजित तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार असून, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाणार आहे. १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे, तर परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२६मध्ये जाहीर करण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२५ अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२६ अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.
३ ते २४ ऑक्टोबर राज्यसेवा परीक्षा
३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२७ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १५ नोव्हेंबर रोजी, विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ होणार आहे, तर फेब्रुवारी २०२७ मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजीच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२६, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल मार्च २०२७ मध्ये जाहीर केला जाणार आहे.
२१ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२६, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे, तर निकाल मार्च २०२७ मध्ये जाहीर केला जाणार आहे. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल एप्रिल २०२७मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.