
आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
मुसळधार पावसाचा इशारा, पाणी तुंबण्याच्या घटना, झाडे कोसळणे आणि उघड्या मॅनहोलचा धोका… अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत मुंबईकरांचा मुख्य आधार असलेली मुंबई महानगरपालिकेची ‘१९१६’ ही आपत्कालीन हेल्पलाइन बुधवारी सकाळच्या सुमारास तब्बल सहा तास ठप्प पडली. पावसाळ्याच्या तोंडावरच शहराची मुख्य जीवनवाहिनी समजली जाणारी हेल्पलाइन बंद पडल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचे धिंडवडे निघाले असून, मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले.(फोटो सौजन्य – AI)
Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणे, झाडे व फांद्या पडणे, धोकादायक इमारतींचा भाग कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात. अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क साधतात. मात्र, बुधवारी नेमक्या याच मुख्य हेल्पलाइनचा बोजवारा उडाल्याने नागरिकांचे फोन लागेनासे झाले. परिणामी, पालिकेकडे तक्रारी नोंदवणे आणि तातडीची मदत मिळवणे अशक्य झाले होते.
महापालिकेकडून हेल्पलाइन बंद पडण्यामागे ‘एमटीएनएल’च्या दूरध्वनी लाईनमधील तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आपत्कालीन हेल्पलाइन काही मिनिटांसाठी बंद पडणेही गंभीर मानले जाते.तिथे तब्बल सहा तास ही यंत्रणा ठप्प राहणे, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा भाग असल्याची टीका होत आहे.या सहा तासांच्या कालावधीत जर एखादी मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल मालाड येथील ब्रिजेश सिंह ने उपस्थित केला आहे.
*१९१६’ हा क्रमांक मुंबईकरांच्या अगदी तोंडपाठ झालेला क्रमांक आहे. त्यामुळे ही सेवा अचानक बंद पडल्यावर पर्यायी क्रमांक शोधण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडाली. पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दोन पर्यायी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली खरी, मात्र त्याची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत तात्काळ पोहोचू शकली नाही. अनेक नागरिक सोशल मीडिया वापरत नसल्याने, आपत्कालीन मदतीची गरज असताना त्यांना पर्यायी क्रमांक शोधण्यातच वेळ वाया घालवावा लागला आणि मोठी गैरसोय सहन करावी लागली.
आपत्कालीन नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र आणि सक्षम बॅकअप यंत्रणा असणे अत्यंत अपेक्षित असताना, पालिकेकडे पर्यायी संपर्क व्यवस्था तात्काळ आणि प्रभावीपणे कार्यान्वित का झाली नाही? याचे समाधानकारक उत्तर पालिकेला देता आलेले नाही. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने तातडीने सक्षम बॅकअप यंत्रणा उभारावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप
एमटीएनएलच्या दूरध्वनी लाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महापालिकेची १९१६ आपत्कालीन हेल्पलाइन काही काळ बंद होती. या कालावधीत नागरिकांच्या सोयीसाठी दोन पर्यायी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. संबंधित तांत्रिक बिघाड आता पूर्णपणे दूर करण्यात आला असून १९१६ हेल्पलाइन सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले. दरम्यान सेवा सुरू झाली असली, तरी या घटनेने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेतील त्रुटी मात्र चव्हाट्यावर आणल्या आहेत.