Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
Amol Kolhe News: शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर राज्यात ऑपरेशन तुतारीच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यावरुन सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रामॅन म्हणून कौतुक केलं आहे. त्यांच्या या कौतुकानंतर सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आली आहे का, असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, ” मला अजून ऑफर आलेली नाही, पण आल्यास विचार करू,” असं सूचक विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “भविष्यात केंद्रीय पातळीवरील नेतृत्वासाठी ज्या नेत्यांची नावे घेतली जातात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मराठी माणसाचे नाव राष्ट्रीय स्तरावर घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.”
Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाई
ते पुढे म्हणाले, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव ज्या आदराने दिल्लीत घेतले जाते, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचीही ‘इन्फ्रामॅन’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मी ही अपेक्षा व्यक्त करतो,” अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी फडणवीसांचे कौतुक केले.सत्ताधाऱ्यांची ऑफर आली का?
सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का या प्रश्नावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “सध्या माझ्याकडे अशी ऑफर आलेली नाही. अशी काही ऑफर आली तर विचार करु. मी विचार करु असं म्हणालो आहे, जाऊ असं म्हणालेलो नाही”. आता कोल्हे यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral
दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काहीही झालं तरी आमचे कोणतेही आमदार आणि खासदार फुटणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे. अमोल कोल्हे यांच्यावरही विश्वास आहे. त्यामुळे ते असं काही करणार नाहीत. कोणी चर्चा केली असावी किंवा भाजपमधून काही लोकं जाणीवपूर्वक अशा चर्चा पेरत असावेत. त्यामुळे आमचा पक्ष फुटेल असं मला तरी वाटत नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच खासदार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पक्षातील एकजूट कायम असल्याचे त्यांनी नमुद केले. “शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, ही राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांची स्पष्ट भूमिका आहे. या विषयावर शरद पवार यांनी आधीच भूमिका मांडली असून, त्यापुढे अधिक चर्चा करण्याची गरज नाही.” गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध पक्षांतील संभाव्य पक्षांतर आणि गटबाजीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशा पार्श्वभूमीवर पाच खासदारांच्या संभाव्य पक्षांतराबाबतच्या चर्चांवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण देत त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले.






