भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई 'हाय अलर्ट'वर; पोलिस यंत्रणा दक्ष ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यात युद्धाची शक्यता सध्या जरी नसली तरीही पाकिस्तानकडून कुरघोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई पोलिस दक्ष असून, मुंबईत हाय अलर्ट कायम आहे. अंतर्गत सुरक्षेसह सागरी किनाऱ्याची सुरक्षाची चोख ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. त्यामुळेच खबरदारी म्हणून संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. मुंबई हे शहर भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि मुंबईच्या किनारपट्टीवर नौदलाचे उत्तर आणि पश्चिम ताफे तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय, मच्छिमारांच्या नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या हालचाली, ओळखीची पडताळणी आणि गस्तीच्या माध्यमातून कोणतीही संशयास्पद हालचाल रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मच्छिमार बोटींवर वॉच
मुंबईच्या किनाऱ्याभोवती पूर्णपणे सतर्कता आहे. येथे उत्तर आणि अरबी नौदलाला तैनात करण्यात आले आहे. मच्छीमार बोटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरही देखरेख वाढवण्यात आली आहे. त्यांना सतर्क राहण्यास आणि समुद्रात कोणत्याही असामान्य हालचाली आढळल्यास त्यांची माहिती देण्यास सांगितले आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
26/11 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी
मुंबईत 26/11 ची धडकी भरवणारी घटना पुन्हा घडू नये यासाठी भारतीय नौदल, मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा समुद्रमार्गावर कडेकोट गस्त घालत आहेत. मुंबईत 26/11 चा जीवघेणा हल्ला अजूनही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, सध्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यंत कडक सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने समुद्र आणि हवाई मार्गांनी होणाऱ्या संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा आदेश दिला आहे.
बोट कर्मचाऱ्यांची माहिती दररोज जाहीर करा
काही दिवसांपूर्वी नौदलाच्या प्रमुखांची मत्स्यव्यवसाय आयुक्तांसोबत बैठक झाली होती. मासेमारी अधिकाऱ्यांना बोटींचा नोंद, तपासणी आणि बोटींची संख्या, त्यांचे मालक आणि बोटीवरील कर्मचाऱ्यांची माहिती दररोज जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर मच्छिमारांनाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.