मुंबईतील यंत्रणा 'ॲलर्ट मोड'वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
मुंबई : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच मुंबईत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदी सर्व यंत्रणांची प्रात्यक्षिके तसेच पूर्वतयारी करून घेण्यात आली आहे. मुंबई ही तर देशाची आर्थिक राजधानीच आहे. त्यामुळे मुंबई तसेच मुंबई परिसरातील संवेदनशील ठिकाणे ही कायम अॅलर्टमोडवरच असतात, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव गृह अनुप कुमार सिंह यांनी दैनिक ‘नवराष्ट्र’ला दिली.
भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच. पण पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. तारापूर, बीएआरसीसारख्या ठिकाणी बंदोबस्त मुंबईनजीकच्या तारापूर, बीएआरसीसारख्या संवेदनशील ठिकाणी कायम बंदोबस्त असतोच. मुंबई नजीकच्या संवेदनशील ठिकाणांवर पोलीस पेट्रोलिंग देखील वाढविण्यात आले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई नेहमीच अॅलर्ट मोडवर असते. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना राज्य सरकारने आधीच केल्या असल्याचे अनुप कुमार सिंह यांनी सांगितले.
नागरी संरक्षण दलाचा अशा परिस्थितीत महत्वाचा वाटा असतो. नागरी संरक्षण दलाला आपत्तीच्या वेळेस काय करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. त्यांचीही पूर्वतयारी करून घेण्यात आली असल्याचे अनुप कुमार सिंह यांनी सांगितले. नागरी संरक्षण दलासोबतच एनसीसी, एनएसएस यांचीही प्रात्यक्षिके करून घेण्यात आल्याचे ते म्हणाले