फोटो - सोशल मीडिया
मुंबई : सध्या मंदिरांमध्ये मिळणाऱ्या प्रसादावरुन चिंता व्यक्त केली जात आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध प्रसादावरुन देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली असताना मुंबईमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. भक्तांनी प्रसाद घ्यावा की नाही याची शंका आता मनामध्ये उपस्थित होऊ लागली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिवियानक मंदिरामधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या सिद्धीवियानक मंदिरातील प्रसादाच्या कॅरेटमध्ये उंदरं असल्याचा किसळवाणा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा दावा करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कॅरेटमध्ये भरुन प्रसाद ठेवण्यात आला आहे. यामध्ये प्रसादाची पाकिटं ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर एका बाजूला प्लास्टिकच्या पिवशीमध्ये उंदरं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सहा ते सात उंदरांची पिल्ल या ठिकाणी प्रसादासोबत कॅरेटमध्ये असल्याचं दिसून येत आहे. याचा किसळवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर प्रसादाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसाद हा लोकांचा आवडीचा आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर भाविकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. यावरुन मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकाऱ्याकडून व्हिडिओतील दावा चुकीचा असल्याचे म्हणण्यात आले आहे. मंदिर प्रशासन या प्रकरणामध्ये म्हटले आहे की, मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते. मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर असल्याचा दावा यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ मंदिरबाहेरचाही असू शकतो, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हायरल फोटो आणि व्हिडिओची चौकशी करण्यात येईल असे सांगितले. प्रसादाच्या टोपलीत उंदीर असल्याच्या व्हिडीओची तपासणी करण्यात येईल, चौकशी होईल. मंदिर प्रशासनातर्फेही घडलेल्या प्रकाराची तपासणी होईल आणि योग्य ते स्पष्टीकरण देण्यात येईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.