मुंबई ते गोवा आता फक्त 6 तासांत, जाणून घ्या कसा असेल कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्प? (फोटो सौजन्य-ट्विटर)
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने कोकण एक्स्प्रेस वे प्रकल्पाचं काम हाती घेतलं आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या 6 तासांवर येणार आहे. वाहनचालकांचा प्रवास सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई आणि गोवा दरम्यान नवीन महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ३७५.९४७ किलोमीटर लांबीच्या कोकण द्रुतगती महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएसआरडीसीने महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
यासंदर्भात एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण विभागाच्या मान्यतेनुसार प्रकल्पाचा डीपीआर निश्चित केला जाईल. रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळून सिंधुदुर्गपर्यंत हा महामार्ग बांधण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे ३,७९२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६८ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गाच्या उभारणीमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ६ तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 12 ते 15 तास लागतात.
मुंबई ते गोव्याचे अंतर कमी करणारा नवा महामार्ग कोकणातून जाणार आहे. ३७५.९४७ किमी लांबीचा हा महामार्ग कोकणातील अनेक डोंगर आणि नदी नाल्यांमधून जाणार आहे. माहितीनुसार, महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीला सुमारे 871 छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. कोकण एक्सप्रेस हायवे 17 हा तालुक्यामधून जातो. एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मार्गावर 14 इंटरचेंज तयार केले जातील जेणेकरून जास्तीत जास्त प्रवाशांना महामार्गाचा वापर करता येईल. कोकण द्रुतगती महामार्ग चार पॅकेजमध्ये तयार करण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
मुंबई ते गोवा हे सध्याचे अंतर ५२३ किमी आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. मात्र दशकाहून अधिक काळ लोटला तरी हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सात ते आठ तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी गाड्यांना 12 ते 15 तास लागत आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने काही किलोमीटरचाही प्रवास करण्यासाठी अनेक तास लागतात. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने मुंबई ते गोवा दरम्यान प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 523 लांबीचे महामार्ग बांधण्याची जबाबदारी दोन संस्थांकडे आहे.
महामार्गाचा काही भाग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दररोज ३० किलोमीटरहून अधिक रस्ता तयार करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय)ही या महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करता आलेले नाही. भूसंपादन व अन्य कारणांमुळे महामार्गाचे बांधकाम वर्षानुवर्षे संथ गतीने सुरू होते.