संग्रहित फोटो
विनीत राजु देवकर (वय ३०, रा. वडारवस्ती, येरवडा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात होळी तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने शहरात गुन्हेगारांच्या झडतीसंदंर्भाने विशेष मोहिम राबविली होती. गुन्हे शाखा सातकडून कारवाई सुरू असताना खराडी पोलिस ठाण्यात धमकावणे तसेच इतर कलमान्वये दाखल गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती. त्या कारवाईतील आरोपी विनीत देवकर हा येरवडा परिसरातील भोसलेवस्ती येथे आलेला असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, पथकाने येरवडा परिसरातील भोसलेवस्ती भागात सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
गेल्या काही दिवसाखाली गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील एका आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छ. संभाजीनगर) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून पकडले आहे. गँगस्टर निलेश घायवळ देखील परदेशात पळाला असून, अद्याप पोलिसाना त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे तसेच उपनिरक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार अमोल सुतकर तसेच त्यांच्या पथकाने केली आहे. पुणे शहरातील पाहिजे व फरार असलेल्या आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद केले जात आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी पोलिस त्यांच्याकडे असलेल्या मोक्कातील पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना उपनिरीक्षक संजय नरळे यांना अमोल लाखे याच्याबाबत माहिती मिळाली. तो बार्शी शहरात राहत असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्यातील सहभाग मान्य केला.






