राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना धोका (संग्रहित फोटो)
मुंबई : महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला .
सरकारने पिकांच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतला असून, बाधित भागांमध्ये देखरेख आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक तीव्र केली आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला असून, तीन आठवड्यांपासून पावसाअभावी अंदाजे २.८५ लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. राज्यात खरीप पिकाची पेरणी १३७.०५ लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे, जे पंचवार्षिक सरासरीच्या ९५ टक्के आहे. राज्यात कृषी वापरासाठी ३९.५४ लाख टन खताची विक्री झाली असून, पुरेसा साठा उपलब्ध आहे. लातूरमध्ये केवळ ५६ टक्के, तर धाराशिवमध्ये ७० टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि तूर ही पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
परभणीमध्ये ५९ टक्के पावसामुळे जवळपास सर्व तालुक्यांतील पिकांवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४७.३ मिमी पावसाची नोंद झाली. देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १४२ मिमी, तर देसाईगंज पर्जन्यमापक मंडळात तब्बल १४५ मिमी पाऊस झाला. शंकरपूर येथेही १३९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन ठिकाणी अतिवृष्टी, तर पाच पर्जन्यमापक मंडळांत जोरदार पाऊस झाला.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑगस्टनंतर पावसाने उघडीप घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका देखील अनुभवत आहे. असे असताना आता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.






