संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता अर्धवेळ नोकरी करून आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ४ लाख ११ हजार ९५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. अॅपवर विविध टास्क पूर्ण केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून सुरुवातीला खात्यावर काही रक्कम जमा करण्यात आली. त्यातून विश्वास संपादन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३१९ (२), ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वापरलेले मोबाइल क्रमांक, टेलिग्राम ग्रुप, संबंधित अॅप तसेच ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली, त्या खात्यांचे धारक यांची माहिती पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
तक्रारदाराला मोबाइलवरून अर्धवेळ नोकरीची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना संबंधित अॅप डाउनलोड करून त्यावर देण्यात आलेले टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर आर्थिक नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला तक्रारदाराच्या खात्यावर काही रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे हा व्यवहार खरा असल्याचा विश्वास त्यांना बसला. त्यानंतर अधिक नफा मिळवण्यासाठी तसेच पुढील टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, तक्रारदाराला काही रकमेचा परतावाही देण्यात आला. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी सांगितलेल्या व्यवहारावर त्यांचा विश्वास कायम राहिला. त्यानंतर विविध कारणे सांगून आणखी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.
मात्र, पुढे अपेक्षित परतावा मिळाला नाही. नफ्यातील परतावा वगळता तक्रारदाराचे ४ लाख ११ हजार ९५० रुपये गेल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी १४ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धवेळ नोकरीच्या नावाखाली टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






