बहुरूपी बनून आलेले ‘ओमायक्रोन’ हे कोरोनाचे नव्या विषाणूचे संकट आता साऱया जगावर घोंगावते आहे. केवळ दक्षिण आफ्रिकेची विमानसेवा रोखून या विषाणूला थोपविता येणार नाही. हा हा म्हणता पाच दिवसांत 12 देशांत पसरलेला हा विषाणू पुन्हा जगभरात हाहाकार उडवण्याचा धोका नाकारता येत नाही. वेशांतर करून आलेल्या कोरोनाच्या या संकटाची तीव्रता ओळखून जनतेनेही सरकारच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करायलाच हवे. असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून कोरोना नियंत्रणासाठी जनतेला आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई : समस्त सृष्टीच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत अजूनही खाली उतरायला तयार नाही. अवघ्या जगाला वेठीस धरणारा आणि अखिल मानवजातीची दोन वर्षे अक्षरशः बरबाद करणारा हा विषाणू पुनः पुन्हा नव्या रूपात प्रगट होतो आणि आता सारे काही सुरळीत सुरू होणार असे वाटत असतानाच त्याचा नवा अवतार पुन्हा दहशत निर्माण करतो.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमायक्रोन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांत अशीच दहशत निर्माण केली आहे. अर्थात नव्या व्हेरिएंटमुळे लगेचच घाबरून जाण्यासारखे काही नसले तरी ज्या बातम्या येत आहेत त्याकडे डोळसपणे आणि गांभीर्याने पाहणेही तेवढेच आवश्यक आहे. कारण हिंदुस्थानात दुसऱ्या लाटेत ‘डेल्टा’ नावाच्या ज्या व्हेरिएंटने सर्वाधिक थैमान घातले, त्यापेक्षा ‘ओमायक्रोन’ हा विषाणू सातपटीने अधिक घातक आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेतील विषाणू देशात मोठय़ा प्रमाणावर पसरण्यापूर्वी ज्या चुका झाल्या त्या चुका कशा टाळता येतील यावर अधिक बारकाईने आता काम करावे लागेल.
या विषाणूचे वेशांतर करून आलेले छुपे रूप हे अत्यंत वेगाने प्रसारित होणारे असल्याने संशोधक, डॉक्टर्स आणि जगभरातील राज्यव्यवस्था धास्तावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत 21 नोव्हेंबर रोजी या घातक विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दोन-तीन दिवसांतच तेथील रुग्णसंख्या 77 वर पोहोचली. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतून जे प्रवासी अन्य देशांत पोहचले त्या देशांतही काही तासांतच या विषाणूने शिरकाव केला. धक्कादायक गोष्ट अशी की, कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या लोकांनाही कोरोनाच्या नवीन विषाणूची बाधा झाली आहे. जग चिंताक्रांत झाले आहे ते या कारणामुळे.
अर्थात त्यामुळे लसीकरणाचे महत्त्व कमी होणार नाही. उलट ‘ओमायक्रोन’ या घातक विषाणूची बाधा झाली तरी लस घेणाऱ्या व्यक्ती या विषाणूंच्या हल्ल्याचा प्रतिकार अधिक समर्थपणे करू शकतील असे जाणकारांचे मत आहे. वाऱ्याच्या वेगाने पसरून हाहाकार उडवण्याची क्षमता असणाऱ्या या विषाणूला अटकाव करायचा असेल तर अधिकाधिक लोकांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्यावे आणि पूर्वीप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, अशा सूचना जगभरातील संशोधक आणि शास्त्रज्ञ वारंवार देत आहेत.
सरकार, प्रशासन आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी लसीकरण आणि जनजागृतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत असतानाच नव्या विषाणूचे संकट दाराशी येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे.
आपल्या देशात ‘ओमायक्रोन’ विषाणूचा एकही रुग्ण अद्याप सापडला नसला तरी बाहेरच्या देशांतून एकही बाधित रुग्ण आपल्या देशात येणार नाही याची डोळ्य़ांत तेल घालून काळजी सरकारला घ्यावी लागेल. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या विषाणूचे रुग्ण आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेसह बारा देशांमधून हिंदुस्थानात येणाऱया प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
मागील चौदा दिवसांत कुठेकुठे प्रवास केला याचा तपशील आणि कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. ओमायक्रोनला आळा घालण्यासाठी केंद्राने उचललेले हे पाऊल योग्यच म्हणावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेने ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ या विषाणूंच्या यादीत ओमायक्रोनचा समावेश केला आहे. त्याचे गांभीर्य ओळखून जगभरातील देशांनी या विषाणूला आपल्या देशात येण्यापासून रोखण्यासाठी धडपड चालवली आहे.