तासगाव, सांगली बाजार समित्यांकडून केवळ जुजबी कारवाई करून ‘नियमन मुक्ती’चा दाखला देत आमची जबाबदारी नसल्याचे सांगितले जात आहे, सांगली, तासगाव येथील सौद्यांवर महाराष्ट्रासह कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा बाजार समितीत होणाऱ्या सौद्यांवर विश्वास आहे. त्यामुळे शेकडो मैलांवरूनदेखील बेदाणा उत्पादक बाजार समितीत येतो. त्यामुळेच बेदाणा नियमन मुक्त झाला तरीदेखील आजही, अपवाद वगळता, बाजार समितीतच बेदाण्याची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने बाजार समितीला व्यापाऱ्यावर अंकुश ठेवणे अशक्य नाही; मात्र बाजार समितीची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही. त्यात तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज पूर्व आणि आटपाडीच्या काही भागात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं एकही नेता भूमिका घेताना दिसत नाहीये. जिल्हा प्रशासनाने देखील कोणतीही कारवाई करण्याची भूमिका घेतली नाही, तर जीएसटी, कस्टम सारखे विभागही मूग गिळून गप्प आहेत.
सांगली जिल्ह्यातील बेदाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम गुणवत्ता, मोठे उत्पादन आणि निर्यातीतील महत्त्व: येथे थॉम्पसन, माणिक चमन यांसारख्या वाणांपासून उच्च दर्जाचे बेदाणे बनतात, ज्यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे आणि ते आशियातील सर्वोत मोठ्या बेदाणा बाजारपेठांपैकी एक आहे, ज्यामुळे जिल्ह्याला ‘बेदाणा हय’ म्हणून ओळखले जाते, सांगलीच्या बेदाण्याला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे, ज्यामुळे त्याच्या गुणवतेची आणि विशिष्टतेची खात्री असल्याने बेदाण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.
भारतीय बनावटीचा चेहरा दाखवून आतून चीनचा बेदाणा अफगानमार्गे तासगाव आणि सांगली येथील बाजारात आणला गेला, कोल्डस्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात हा बेदाणा आणला गेला, ज्याचे कोणतेही (रेसिड्यू फ्री) अवशेषमुक्त तपासणी करण्यात आलेला नाही. तो छुप्या मार्गाने आलेला आहे. यापासून ग्राहकांच्या जीविकास धोका निर्माण करून राजरोज काळाधंदा शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेऊन उभारलेल्या कोल्डस्टोरेजच्या आडून सुरू आहे. महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचे अनुदान घेऊन हे व्यपारी देशद्रोही कारवाया करीत आहेत, दुसरीकडे बाजारात स्थानिक बेदाण्याचे दर पडून शेतकरी देशोधडीला लागत आहेत.






