मुंबई: लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी (Memorial Of Lata Mangeshkar) भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam Wrote A letter To Sharad pawar) यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्र पाठवले आहे. या पत्रात शिवाजी पार्कमध्येच लतादीदींचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राम कदम यांनी केली.
[read_also content=”50% जागांवर सरकारी कॉलेजप्रमाणेच फी; खासगी वैद्यकीय महाविद्यालय, डिम्ड विद्यापीठासाठी नवे नियम https://www.navarashtra.com/latest-news/fees-similar-to-government-colleges-in-50-of-seats-new-rules-for-private-medical-college-deemed-university-nrvk-234694.html”]
शरद पवार यांना पत्र पाठवत आग्रह
राम कदम यांच्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याने आता राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र पाठवत आग्रह केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शरद पवारजी तुम्ही महाराष्ट्र सरकारला लतादीदींचे अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी त्यांचे स्मारक उभारायला सांगाल का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार किमान शरद पवार यांच्या बोलण्याचा मान तरी ठेवतात का, हे पाहू, असे नमूद करत राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याचे मानले जात आहे.
स्मारकाचे राजकारण करु नका
दरम्यान शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, या भाजप आमदार राम कदम यांच्या मागणीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना लतादीदींच्या स्मारकाचे राजकारण करु नका, असा इशारा भाजपला दिला होता. लता मंगेशकर यांचे स्मारक उभारणे ही इतकी सोपी बाब नव्हे. लतादीदी आपल्या देशाच्या आहेत आणि जगाच्याही आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशाप्रकारचे लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्रात नक्की उभारले जाईल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार नक्की त्याचा विचार करेल. असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
राजकीय पक्षांमध्ये मतभेद
मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यानी शिवाजी पार्क मध्ये स्मारक उभारण्यास विरोध केला आहे. हे खेळाचे मैदान आहे आणि ते एकमेव मोठे मैदान आहे त्यामुळे स्मारक अन्यत्र केले जावे,असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदिप देशपांडे यांनी देखील व्टिट करत शिवाजी पार्कऐवजी लता मंगेशकरांचे स्मारक अन्यत्रच हवे असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे आणि ते दादरच्या जनतेच्या संघर्षामुळे टीकून राहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की राजकीय खेळीसाठी मैदानाचा बळी नको. मात्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यानी मात्र शिवाजी पार्क येथेच लताजींचे स्मारक हवे असल्याचे समर्थन केले आहे.