मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; 'एसी'साठी १२ लोकल करणार बंद
मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या वाढत असताना मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकल फेऱ्या वाढवण्याची आणि १५ डब्यांच्या लोकल चालवण्याची मागणी होत असताना लोकल रद्द करण्याचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. एका अंदाजानुसार, पीक अवरमध्ये एका लोकलमधून सुमारे ५ ते ६ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे १२ लोकल रद्द झाल्यास तब्बल ४० ते ५० हजार प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: istock)
रद्द करण्यात आलेल्या लोकलच्या प्रवाशांना इतर लोकलमधून प्रवास करावा लागणार आहे. मात्र, आधीच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये अत्तिरिक्त प्रवासी आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुंबई लोकलमधील गर्दीमुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कॅटचे राष्ट्रीय महामंत्री शंकर ठक्कर म्हणाले एसी लोकल चालवण्याच्या नावाखाली हजारो सामान्य प्रवाशांना त्रास देणारा हा निर्णय आहे. मुंबईतील लाखो प्रवाशांच्या अडचणींची माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता आरगडे यांनी सांगितले की, आमचा एसी लोकलला विरोध नाही. मात्र साध्या लोकल रद्द करून एसी लोकल चालवणे चुकीचे आहे. त्यामुळे इतर लोकलमध्ये गर्दी वाढेल. कोणताही बदल करण्यापूर्वी प्रवाशांना किमान एक महिना आधी माहिती द्यायला हवी.
रेल्वे प्रवासी सेवा सुविधा संघटनेचे अध्यक्ष पारसनाथ तिवारी यांनी सांगितले की, नॉन एसी लोकल बंद करून एसी लोकल सुरू करणे म्हणजे सामान्य प्रवाशांवर अन्याय आहे. एसी लोकलचे भाडे कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची अमलबजावणी झालेली नाही.






