राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेपाटपही झाले. त्यानंतर विविध जिल्ह्यातील पालकमंत्री कोण असेल याच्या नावांची घोषणाही झाली. त्यामध्ये रायगडसाठी आदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नंतर ही नावे मागे घेण्यात आली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले. ‘पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत’, असे ते म्हणाले.
महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद नाहीत. काही कुरबुरी असतील त्यावर चर्चेतून मार्ग निघेल, असे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सातारा, संभाजीनगर, यवतमाळ येथे आमचे मंत्री असतानासुद्धा शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
रायगड, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या महायुतीत विशेषतः शिवसेनेत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्टयात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ असून, त्यांचा मानसिक पराभव झाला आहे. त्यामुळेच विरोधक सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे तसेच बीड आणि परभणी येथील घटनांचे राजकारण करत आहेत. वास्तविक, अशा घटनांचे कोणीही राजकारण करू नये. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी आमच्या महायुतीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपली महाविकास आघाडी कशी टिकेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचा टोलाही या वेळी लगावला.
मुख्यमंत्री विरोधकांना पुरून उरतील
ज्या-ज्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या-त्या वेळी काही घटकांकडून महाराष्ट्र अशांत केला जातो, असेही बावनकुळे यांनी सांगितले. पण, विरोधकांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याला पुरून उरतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.