Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन
मुंबई आणि ठाण्यासह अनेक भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. दादर, लोअर परळसह वांद्रे परिसर आणि इतर अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलूंड परिसरात देखील पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड या शहारांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आजपासून ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंबई आणि ठाण्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील वरळी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्याच पावसात आता मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सखल भागांत आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन कराव लागत आहे. तसेच सायन परिसरात देखील पाणी साचल्याने सांगितलं जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 आणि 23 जून रोजी दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राजवळच्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर, 24 ते 26 जून या काळात मुंबई, उत्तर कोकण आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे.






