File Photo : Mahayuti
मुंबई : भाजप-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात गेले होते. त्यामुळे चर्चा झाली नाही. पालकमंत्रिपदासंदर्भात फारतर दोन दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सद्यस्थिती माध्यमांसमोर सांगितली.
भाजप सदस्यनोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी सदस्यसंख्या असलेला पक्ष करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला ३ कोटी ११ लाख मतं मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला मोठं यश दिलं आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे सदस्यत्व घेण्यासाठी सामान्य जनतेचा मोठा ओघ आमच्याकडे असल्याचे बावनकुळे म्हणाले.
वक्फ बोर्ड कायद्यासंदर्भात अहवाल येईल
वक्फ बोर्डाच्या कायद्यासंदर्भातील पुढील कृतीबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. लोकसभेची संयुक्त समिती त्या यासंदर्भात गठित झाली आहे. वक्फ बोर्डाने हिंदू देवस्थानच्या बळजबरीने जप्त केलेल्या जमिनी, सर्वसामान्य जनतेच्या जमिनी किंवा कोणत्याही मालमत्ता ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने गेल्या आहेत, त्या परत मिळाल्या पाहिजे. यासाठी सरकार काम करत आहे.
बीड हत्या प्रकरणात चौकशी सुरू
आ. सुरेश धस यांच्याशी माझे २-३ वेळा बोलणे झाले आहे. धस यांनी कोणतीही गोष्ट जाहीरपणे उघड करण्याऐवजी सरकारकडे मांडली पाहिजे. त्यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चर्चा झाली. पुन्हा बोलतील. आपली जी भूमिका सरकारशी संबंधित असेल ती सरकारसमोर आणि पक्षाशी संबंधित जी भूमिका असेल, ती माझ्यासमोर मांडली पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.
मंत्रिपदे मिळवण्यासाठी सुरु होती रस्सीखेच
महायुतीमध्ये हवी ती मंत्रिपदे मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच आता पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने त्याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. सध्या महायुतीतील तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरात पडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.