
कला भारती असोसिएशनच्या सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश; महिला सशक्तिकरणावर भर
कार्यक्रमात महिलांना आर्थिक साक्षरता, जीईएम (GEM) पोर्टल, मुद्रा योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योजकता विकास तसेच आरोग्य व पोषण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कला भारती असोसिएशन आणि भाजपने महिलांच्या विकासासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अमित साटम, विधान परिषद सदस्या उमा खापरे, मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे, विधान परिषद सदस्या माधवी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कला भारती असोसिएशनच्या संस्थापक व अध्यक्षा उषा बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे सांगितले. देशसेवेसाठी समर्पित व्यक्तींना भाजपसारखा पर्याय नाही, असे त्यांनी नमूद केले. तसेच कला भारती असोसिएशन महिलांना सक्षम बनविण्यासाठी करत असलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या भाजपच्या भूमिकेचा उल्लेख करत अभिषेक कोली यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले. त्यांनी तळागाळातील लोकांशी संवाद साधून समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
उषा बाजपेयी यांनी महिला आत्मनिर्भरतेसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. विकसित भारताच्या निर्मितीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कला भारती असोसिएशनचे सदस्य अभिषेक कोली यांनी भाजपात प्रवेश करताना राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कला भारती आणि भाजप यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या “उडाण” दिव्यांग संगीत समूह (ब्लाइंड ऑर्केस्ट्रा) यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. तसेच विविध राज्यांतील महिला व पुरुष उद्योजक, हस्तकला कलाकार आणि समाजसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गुजरात, महेश्वर, संभाजीनगर, पुणे आदी भागांतील पारंपरिक कला आणि महिला उद्योजकतेलाही या कार्यक्रमातून व्यासपीठ मिळाले.