कल्याणमध्ये परप्रांतीय महिलांकडून शेतकरी कुटुंबाचा छळ, पोलिसांनाही धक्काबुक्की
कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी-अमराठी वाद उफाळून आला होता. मारहाणही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा कल्याण ग्रामीणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. काही परप्रांतीय महिलांनी शेतकरी कुटुंबाला धमकावून त्यांच्या घरावर दगफेक केली. शिवाय घटनास्थळी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावांत एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यावसायिक वाद सुरु असून सदर प्रकरण हे कोर्टात आहे. यातच गेले काही दिवस पन्नास ते साठ परप्रांतीय महिला या जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावत, शिवीगाळ करत त्रास देत आहेत आणि त्याच्या घरावर दगफेकही करण्यात आली आहे. दरम्यान, या शेतकरी कुटुंबाने पोलिसांना सदर बाब कळविली. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितले. मात्र, त्या महिलांनी पोलिसांशी अरेरावी करत महिला पोलिसाला धक्का दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला आहे.
सदर घेटणेबाबत शेतकरी कुटुंबियांना विचारले असता, सदर महिला या व्यावसायिकाने पाठविल्या होत्या. तसेच, या जागेचे प्रकरण कोर्टात असून आम्ही याबाबत पोलिसांना कळविले आहे. मात्र, पोलिसांनी त्या महिलांवर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या परप्रांतीय माहिलांमुळे आमच्या कुटुंबातील महिला, मुले घाबरली आहेत. तसेच बाजूच्या इमारतीतील नागरिकांना सुद्धा याचा त्रास होत आहे.
पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे. या कुटुंबीयांना न्याय मिळत नासल्याने त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांच्याकडे धाव घेतली आणि हा प्रकार सांगितला. यानंतर केणे यांनी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघतील पदाधिकारी आणि शेतकरी कुटुंबियांना घेऊन थेट डायघर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांकडे सर्व प्रकाराबाबत वाचा फोडली. यानंतर पोलिसांनी हा प्रकार तपासून आम्ही पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले.
या प्रकाराबाबत पोलिसांना विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे आम्ही या व्यवसायिकाला नोटीस पाठवली असून शांतता व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पोलीस आता त्या परप्रांतीय महिलांवर गुन्हा दाखल करणार का आणि त्यांना अटक करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
” ज्या वेळेस हा प्रसंग घडला होता त्यावेळी कायद्याच्या चौकटीत राहून हाताळावा म्हणून आम्ही ११२ नंबर वर संपर्क केला होता की इथे काही अनुचित प्रकार घडू नये. सदर प्रकार आम्ही जेव्हा संपर्क केला तेव्हा काही महिला पोलीस कर्मचारी आणि पुरुष पोलीस कर्मचारी घटनास्थळी आहे होते. सदर महिला या महिला पोलिसांच्या अंगावर देखील धावून जात होत्या. त्यावेळी माझ्या पक्षकारांनी संबंधित महिलांचे चित्रीकरण देखील केलं असून त्यात स्पष्ट दिसत आहे की त्या महिला एवढ्या रागीट होत्या की त्या महिला पोलिसांच्या देखील अंगावर धावून जात होत्या. तर साधारण शेतकरी त्यांच्यासमोर काय करणार”. – वकील आशिष पाटील