आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
या दिवसांसाठी काही भागांकरिता अतिवृष्टीचा इशाराही जारी करण्यात आला आहे. २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, ३० जून ते ५ जुलै दरम्यान या प्रदेशात अधूनमधून पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदुर पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळं पाऊस परतण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि सौराष्ट्र-कच्छ प्रदेशातही ३० जून ते ५ जुलै दरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, या भागात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी वेगापर्यंत) वाहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात वरच्या थरातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे, ज्यामुळे आर्द्रता वाढून राज्यात सतत पाऊस पडत आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढू शकते. हवामान विभागाने नागरिकांना, विशेषतः मच्छिमारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण अरबी समुद्रात हवामान खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टी आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






