मुंबईकरांच्या अडचणीत वाढ! वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण
BEST कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वेतन करार तातडीने लागू करण्यात यावेत, अशी युनियनची प्रमुख मागणी आहे. विशेषतः २०१६ ते २०२१ आणि २०२१ ते २०२६ या कालावधीतील वेतन करारांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय BEST कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व सुविधा मिळाव्यात, अशीही मागणी युनियनने केली आहे.
BESTच्या वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही युनियनने उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आहे.
सेवानिवृत्त BEST कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम थकबाकीची रक्कम वेळेत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यासाठी विलंब होत असल्याचा मुद्दा युनियनने मांडला आहे.
BEST उपक्रमाच्या आर्थिक अडचणींचा मुद्दाही युनियनने उपस्थित केला आहे. BESTचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
BEST Workers Unionच्या घोषणेनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील ४२, केनेडी ब्रिज येथील BEST Workers Unionच्या कार्यालयात बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे.
या आंदोलनात BESTच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच वेट लीज बस कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्याही मांडल्या जाणार आहेत. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे.
BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन