मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवलीत साचले पाणी; लोकल सेवाही विस्कळीत
मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांना बसला आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल सेवाही १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. २ आणि ३ जुलै रोजी या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहू शकतो. अरबी समुद्रातून येणाऱ्या मजबूत पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरीतील डी.एन. नगर मेट्रो स्थानकाजवळ एक मोठे झाड मुख्य रस्त्यावर कोसळल्याने मार्ग बंद झाला. तसेच स्वामी विवेकानंद (एस.व्ही.) रोडवरही झाड पडल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दल आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून झाडे हटवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ या २४ तासांत पूर्व उपनगरांत सरासरी १०९ मिमी, पश्चिम उपनगरांत ८७ मिमी, तर मुंबई शहर भागात ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथे १३२.४ मिमी, तर बोरिवली येथे १२६ मिमी पाऊस झाला. दिंडोशी अग्निशमन केंद्रात १२३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
भरती-ओहोटीची वेळ
भरती (High Tide): दुपारी १:१० वाजता – ४.२२ मीटर
ओहोटी (Low Tide): सायंकाळी ७:१६ वाजता – १.९१ मीटर
हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, जलसाचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






