राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवारी 26 ऑगस्ट रोजी बदलापूरकरांच्या भेटीला येणार आहेत. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे बदलापूरमध्ये येणार आहेत. यावेळी ते बदलापूरमध्ये झालेल्या घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज ठाकरे बदलापूरकरांची भेट घेणार आहेत. आदिती बँक्वेट हॉल, शामराव विठ्ठल बँक, स्टेशन रोड, सानेवाडी, बदलापूर पश्चिम या ठिकाणी राज ठाकरे बदलापूरमधील नागरिकांची भेट घेणार आहेत. याबाबत ठाण्यामधील मनसेचे अविनाश जाधव यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कणकवलीत मविआचे आंदोलन; काळ्या फिती बांधत सरकार विरोधात घोषणाबाजी
बदलापूरमधील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्या, अशी मागणी केली जात आहे. यासाठी बदलापूरमधील नागरिकांनी आंदोलन देखील केलं होतं. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आतापर्यंत राज ठाकरेंनी कठोर भुमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मिडीयावर अनेक पोस्ट देखील केल्या आहेत, तसेच या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी केली आहे. या घटनेनंतर सुरु असणाऱ्या राजकारणावरून देखील राज ठाकरे यांनी टिका केली होती.
विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केलं होते. याप्रकणावरून देखील राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.
हेदेखील वाचा- बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबई कोर्टात सुनावणी, सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश
राज ठाकरे म्हणाले होते की, महाविकास आघाडीचे सरकार असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत होत्या. ज्यांनी बंद पुकारला होता, त्यांच्याही काळात या घटना घडल्या होत्या. आज जी प्रकरणे एकामागोमाग उघडकीस येत आहे त्यामागे काही राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का? निवडणुका आल्या की सरकारला बदनाम करा असे सुरू आहे. मविआ सरकारच्या काळात असे होतेच की, त्याचे काय करणार? या सर्व प्रकारानंतर उद्या राज ठाकरे बदलापूर वासीयांची भेट घेणार आहेत. बदलापूरमधील आदिती बँक्वेट हॉल या ठिकाणी ही भेट होणार आहे. या भेटीवेळी राज ठाकरे बदलापूरमधील जनतेशी काय बोलणार, आरोपी अक्षय शिंदेला शिक्षा होण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
बदलापूर, ठाणे येथे शाळेच्या सफाई कामगार आरोपी अक्षय शिंदेने तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी शाळेची आणि अक्षय शिंदेच्या घराची देखील तोडफोड केली. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेवर कारवाईचे आश्वासन देत या प्रकरणाची त्वरीत चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले. आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.