सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणाऱ्या रिक्षाचालकाला मिळालं मोठं बक्षीस
सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातून सैफ अली खान बचावला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान त्या रात्री गंभीर जखमी अवस्थेत सैफ अली खान रिक्षाने प्रवास करत रुग्णालयात गेला होता. सैफवर हल्ला करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर ६ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे. या संकटसमयी सैफच्या मदतीला रिक्षाचालक धावून आला होता होता. त्या रिक्षाचालकाला बक्षीस देण्यात आलं आहे.
रिक्षाचालक भजन सिंह यांनी त्या घटनेबाबत मोठा खुलासा केला होता. त्या रात्री एका महिलेने रिक्षा थांबवली. यानंतर जखमी सैफला रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांच्यासोबत एक युवक आणि लहान मुलगा होता. सैफ गंभीर जखमी झाला होता. ते सर्वजण एकमेकांसोबत कोणत्या रुग्णालयात जायचं, याविषयी चर्चा करत होते’ दरम्यान, याच रिक्षाचालक भजन सिंहचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवल्यानंतर कोणतेही भाडे आकारले नसल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान अद्याप करीना कपूर आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संकटसमयी मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला बक्षीस मिळालं आहे. एका संस्थेने त्यांना मदत केली आहे. या संस्थेने ही मदत केली आहे. या संस्थेने रिक्षाचालकाने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. रिक्षाचालकाला ११ हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. या रिक्षाचालकाने सैफला रुग्णालयात नेण्यात उशीर केला असता, तर त्याची प्रकृती आणखी बिघडली असती असं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. सैफच्या मणक्यात २.५ इंचाचा चाकू अडकला होता. त्याची वेळेत शस्त्रक्रिया झाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
मुंबई पोलिसांनी आणि ठाणे पोलिसांनी सैफच्या आरोपीला ठाण्यातल्या कासारवडवलीतून ताब्यात घेतलं. यानंतर त्याला पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे. शिवाय पोलिसांनी पत्रकार परिषदेत आरोपीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.