गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत राज्य सरकारने तीन महत्त्वाचे जीआर काढले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उपसमितीमार्फत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयावर समाधान व्यक्त करत मनोज जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पाच दिवसांचे उपोषणही सोडले आणि राज्यभरातून मुंबईत आलेला मराठा समाज पुन्हा आपापल्या गावी परतला. या निर्णयामुळे दोन्ही घटकांचे समाधान झाल्याचे म्हटले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मास्टरस्ट्रोक” मारल्याची चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर “देवाभाऊ” अशा शीर्षकाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र, या जाहिरातींमध्ये कोणताही सोर्स नमूद करण्यात आला नाही. त्यामुळे “ही जाहिरात दिली तरी कोणी?” असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, ही जाहिरात प्रत्यक्षात एका मंत्र्याने दिल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत या जाहिरातींच्या सोर्सवर निशाणा साधला असून कोट्यवधींच्या जाहिरातींवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. “या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे.” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील, असही त्यांनी म्हटलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका
तसेच, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. असंही रोहित पवारांनी म्हटंल आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असे संबोधणारे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना दिसतात. बॅनरवर फक्त “देवाभाऊ” असा उल्लेख असून, राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच… ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,” असाही मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार. ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा… देवाभाऊ,” असेही लिहिले आहे. हे बॅनर नेमके कुणी लावले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, मराठा आरक्षणावरचे जीआर काढल्यानंतर भाजपनेच ही बॅनरबाजी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.