Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना मिळतोय विरोधी पक्षांकडून चांगला प्रतिसाद; आता 'या' पक्षाने दिला पाठिंबा (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आता होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना आमचा पक्ष पाठिंबा देईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतची पोस्टही त्यांनी ‘एक्स’वर केली.
ओवैसी म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांना निवडणुकीत जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. एआयएमआयएम हैदराबादी आणि आदरणीय कायदेतज्ज्ञ असलेल्या जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा देईल. मी जस्टिस रेड्डी यांच्याशीही बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या’, असेही त्यांनी सांगितले.
तेजस्वी यादव यांनीही दिला पाठिंबा
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा दिला. बी. सुदर्शन रेड्डी जी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. त्यांना आमच्या सर्व खासदारांचा पाठिंबा असेल. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की, ते संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करतील आणि सभागृह (राज्यसभा) अधिक प्रभावीपणे चालवतील. सध्याच्या काळाची मागणी अशी आहे की, अशा व्यक्तीची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करावी, जी संविधानाचे रक्षण करू शकेल आणि सर्वांसोबत एकत्र काम करू शकेल.’
लोकसभा-राज्यसभेचे खासदार करतात मतदान
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 68 मतदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता कोणाला आघाडी मिळणार याची उत्सुकता कायम होती. धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीची घोषणा झाली. संख्याबळ पाहिल्यानंतर एनडीएने सी. पी. राधाकृष्णन विजयी होतील, असे चित्र वाटत होते. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र दिसत होते