
एसटीचे NCMC कार्ड काढताना करावा लागतोय अडचणींचा सामना; ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने मिळेना कार्ड
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी लागू केलेली ‘एनसीएमसी’ कार्ड योजना सध्या ज्येष्ठ प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कार्ड काढताना वयोमानामुळे बोटांचे ठसे जुळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना या कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. पूर्वी एसटीने प्रवास करताना केवळ ओळखपत्र दाखवून सवलतीच्या दरात अथवा मोफत प्रवास करता येत होता. मात्र, आता सवलतीसाठी हे नवीन कार्ड बंधनकारक करण्यात आल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे ते मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची, तर ७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाने ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीचे केले असून, बसस्थानकांसह विविध ठिकाणी हे कार्ड देण्याची सुविधा सुरू केली आहे. मात्र, केंद्रांवर बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना तातडीने कार्ड देण्यास नकार दिला जात आहे. अशा नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो; मात्र, तेथे जाऊनही यावर कोणताही समाधानकारक तोडगा निघत नसल्याचे त्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पूर्वी अधिकृत ओळखपत्र तयार करताना बायोमेट्रिक पडताळणी झालेली असताना, त्याच ओळखपत्राच्या आधारे थेट ‘एनसीएमसी’ कार्ड का दिले जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी पूर्वीचे एसटी ओळखपत्र जपून ठेवले नाही, त्यांना सध्या कार्ड काढताना मोठ्या अडचणी येत आहेत.
तसेच अपघातामुळे हात नसलेल्या किंवा शारीरिक व्याधींमुळे बोटांचे ठसे देणे अशक्य असलेल्या नागरिकांसाठी महामंडळाकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. तांत्रिक कारणांमुळे शासनाने दिलेली प्रवास सवलत नाकारली जाऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने तात्काळ सुलभ मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप
महामंडळाने ज्येष्ठांच्या सवलत व मोफत प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, वयोमानामुळे ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने केंद्रांवरून त्यांना माघारी पाठवले जात आहे. पूर्वी केवळ आधारकार्ड किंवा एसटी ओळखपत्र दाखवून प्रवास करता येत होता. आता या तांतडीच्या नियमामुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे ज्येष्ठ प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून, महामंडळाने यावर तात्काळ सुलभ मार्ग काढण्याची मागणी होत आहे.