प्रताप सरनाईक यांनी दहिसर चेक नाक्याची केली पाहणी (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
दहिसर: राज्यात सध्या अनेक ठिकाण वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. दरम्यान याचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दहिसर चेक नाका परिसराची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात काही सूचना केल्या.
दहिसर चेक नाका येथे केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो. त्यामुळे टोल ठेकेदारानी हमरस्त्यावरील दोन्ही बाजूने मुंबई कडे जाताना ३ रांगा व येताना २ रांगा (लेन ) या अवजड वाहनांचा टोल घेण्यासाठी चालू ठेवावेत. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज दहिसर चेक नाका परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी,टोलचे ठेकेदार उपस्थित होते.
मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हलक्या चारचाकी वाहनांना टोल माफी केली आहे. तरी देखील दररोज सकाळी व संध्याकाळी दहिसर चेक नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. टोल ठेकेदारांनी रस्त्यावरील उभारलेल्या वेगवेगळ्या लेन मुळे वाहनांचा वेग मंदावतो. साहजिकच त्यामुळे लांबलचक रांगा लागतात आणि सर्व सामान्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
हे दूर करण्यासाठी तातडीने टोल ठेकेदारांनी मुंबईकडे जाताना केवळ ३ व येताना २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. जेणेकरून हलक्या वाहनांचा अडथळा दुर होऊन जलदगतीने वाहने चेक नाका परिसरातून निघून जातील, पर्यायाने वाहतूक कोंडी होणार नाही. आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने ५०० मीटर पर्यंत लावण्यात यावेत.जेणेकरुन वाहन धारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रीतीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एस.के. स्टोन सिग्नल जवळील उड्डाणपूलाच्या बांधकामाची पाहणी केली. अंतिम टप्प्यात आलेल्या या उड्डाणपूलाचे लोकार्पण या फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली.
एसटी प्रवाशांनी ‘UPI’द्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत
महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात. एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती.