नागपूर महापालिका निवडणूक : अपक्षांना चिन्हांचे वाटप पूर्ण, प्रचाराची रणधुमाळी सुरू
निवडणूक रणधुमाळीला वेग ! नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप पक्षश्रेष्ठींच्या सभा
भाजप, काँग्रेस, बसपा, शिंदे गटाची शिवसेना, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आम आदमी पार्टी या अधिकृत पक्षांचे उमेदवार नामांकन दाखल झाल्यापासूनच प्रचारात सक्रिय झाले होते. मात्र, निवडणूक चिन्हे मिळाल्यानंतर आता अपक्ष उमेदवारही रविवारपासून प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. काहींनी आज शनिवारी दुपारनंतरच प्रचार सुरू केला.
पतंग, टॉर्च, ट्रक, हेल्मेट, चावी, ऑटो रिक्षा, केटली, गॅस सिलिंडर, जेवणाची थाळी, सफरचंद, कप-बशी, मेणबत्ती अशी चिन्हे अपक्षांना मिळाली आहेत. तर काही अपक्ष उमेदवारांना नारळ तर काहींना मेणबत्ती हे चिन्ह मिळाले आहे. याशिवाय सिलिंग फॅन, सूर्यफूल, हिरा, पुस्तक, एअर कंडिशनर, टोपली आणि पाटी ही चिन्हे मिळाली. प्रमुख पक्षांची कमळ, पंजा, तुतारी, मशाल, घड्याळ, रेल्वे इंजिन, धनुष्यबाण, हत्ती, सायकल ही चिन्हे मतदारांना परिचितच आहेत. आता उमेदवार घरोघरी पोहोचू लागल्यावर मतदारांना या वेगवेगळ्या व रंजक चिन्हांचीही ओळख होणार आहे.
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना १३ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत प्रचाराची मुदत देण्यात आली आहे. अवघे दहा दिवस उमेदवारांच्या हाती आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकूण ९९२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, काल माघारीच्या अंतिम टप्यात ३०२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे अनेक प्रभागांत सरळ लढतींचे चित्र स्पष्ट झाले असले तरी बहुतांश प्रभागांत तिरंगी, चौरंगी लढती रंगणार आहेत. प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि भाजपसाठी यंदाची निवडणूक सोपी नाही. दोन्ही पक्षांना बंडखोर उमेदवारांची मोठी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले अनेक इच्छुक थेट अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून काहींनी प्रतिस्पधी पक्षांची वाट धरली आहे. या बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवारांची गणिते बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Border 2 Star Cast Fees: स्टार कास्टच्या कमाईत सनी देओल अव्वल; वरुण धवनसह इतर कलाकारांची फी किती?
बंडखोरांपेक्षाही पक्षांतर्गत नाराज कार्यकर्ते काँग्रेस आणि भाजपसाठी अधिक घातक ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी न मिळाल्याने तसेच स्थानिक पातळीवर डावलल्याच्या भावनेतून अनेक कार्यकर्ते सक्रिय प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी तर तिकीट वाटप प्रक्रियेत असलेल्या नेत्यांना ‘पाहून घेऊ’च्या धमक्या दिल्याचीही माहिती आहे. काही प्रभागांत ही नाराजी उघडपणे दिसून येत असून त्यामुळे पक्षनेतृत्वाची चिंता वाढली आहे. नाराजांना सांभाळणे ही प्रमुख राजकीय पक्षांसमोर सर्वात मोठी कसोटी आहे.
राजकीय पक्षांचे निवडणूक निरीक्षक आणि रणनीतीकार विधानसभा मतदारसंघनिहाय मागील निवडणुकांत मिळालेल्या मतांच्या आधारे प्रभागनिहाय गणिते मांडण्यात व्यस्त झाले आहेत.
कोणत्या प्रभागात कोणता समाजघटक निर्णायक ठरेल, कोणत्या उमेदवाराला कोणत्या भागातून अधिक मताधिक्य मिळू शकते, याचा सखोल अभ्यास सुरू आहे. त्यानुसार प्रचाराची दिशा, मुद्दे आणि कार्यक्रम आखले जात आहेत.
एकूणच, चिन्हांचे वाटप पूर्ण झाल्याने आणि उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट झाल्याने आता निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन आणि मतदारांचे मन जिंकण्यासाठीची चुरस अधिक तीव्र होताना दिसणार आहे.






