File Photo : Nagpur University
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 2024 एकूण 1 हजार 197 परीक्षा घेतल्या होत्या. त्यापैकी 673 परीक्षांचे निकाल 30 दिवसांत जाहीर करण्यात परीक्षा विभागाला यश आले. उर्वरित 450 परीक्षांचे निकालही लवकरच जाहीर होणार आहेत. परीक्षा विभागाची संपूर्ण ऑटोमेशनकडे वाटचाल सुरू असल्याने पाहून चालू शैक्षणिक वर्षात 2025 च्या अखेरपर्यंत विद्यापीठ पूर्णपणे ‘ई-सक्षम’ होईल, असा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी बोलून दाखविला.
हेदेखील वाचा : पुण्यातील टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा…; चंद्रकांत पाटलांचे वन विभागाला निर्देश
विद्यापीठात गुरुवारी सिनेटची बैठक झाली. परीक्षा घेतल्यानंतर त्याचा निकाल 30 दिवसांत जाहीर करणे विद्यापीठाला बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात विद्यापीठ सातत्याने विलंब करत असल्याने राज्यपालांना यावरून निवेदन द्यावे लागले होते. त्यामुळेच सिनेट सदस्य शुभांगी नक्षिने यांनी हा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजय कवीश्वर यांनी 30 दिवसांत 673 परीक्षांचे निकाल जाहीर केल्याचे सांगत काही तथ्य मांडले. यात 20 दिवसांत 549, 21 ते 25 दिवसांत 96, 26 ते 30 दिवसांत 27 परीक्षांचे निकाल जाहीर झाले.
केवळ एका परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास 32 दिवस लागले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा 31 डिसेंबर 2024 ला संपल्या. त्यामुळे लवकरच 450 परीक्षांचे निकालही जाहीर होणार असल्याचे स्पष्टीकरण डॉ. कविश्वर यांनी दिले.
ई-सक्षम प्रणाली म्हणजे काय?
विद्यार्थी, शैक्षणिक सत्रे, वित्त आणि विद्यापीठ प्रशासनाशी संबंधित विविध कामकाजाच्या ऑनलाईन अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ई-समर्थ पोर्टल मार्फत नागपूर विद्यापीठात ई-सक्षम प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे परीक्षांशी संबंधित खर्च कमी करण्यास मदत मिळत आहे. शिवाय प्रशासकीय कामकाजाला गती येऊन वेळेचीही बचत होणार आहे. या प्रणालीमुळे प्रशासकीय कामात अधिक पारदर्शकता येत आहे.
हेदेखील वाचा : ‘आमच्याकडे अणुबॉम्बइतके शक्तिशाली लढवय्ये आहेत’, तालिबानने पुन्हा पाकिस्तानवर ओढले ताशेरे