285 शाळांचा भार प्रत्येकी एका शिक्षकावर, नवीन सत्रात उडणार तारांबळ
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा विषय सातत्याने उठत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1644 शाळा असून त्या शाळांपैकी तब्बल 285 शाळांचा भार एकाच शिक्षकावर आहे. पहिली ते चौथीचे चार वर्ग एकाच शिक्षकाला घ्यावा लागत आहे. याचा परिणाम मात्र शाळेतील पटसंख्येवर होत आहे.
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म-2 भरण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ
राज्य शासनाने ‘गाव तिथे शाळा’ हे धोरण अवलंबीत प्रत्येक गावी जिल्हा परिषदेची शाळा उघडली आहे. काही गावांची लोकसंख्या कमी आहे. तरीही त्या ठिकाणी बऱ्यापैकी विद्यार्थी होते. मात्र, पुढे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांसोबत या शाळांची स्पर्धा निर्माण झाली. शाळांची संख्या वाढल्यामुळे पटसंख्या घसरली आहे. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे राहू नयेत, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात; पण मागील तीन-चार वर्षांपासून जि.प. शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, जिल्ह्यातील 285 शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक कार्यरत आहे. त्याच्यावर चार वर्गाचा भार असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थी घडणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 1044 शाळा आहेत. यापैकी इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण 285 शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक नियुक्त आहेत. त्यामुळे या चार वर्गाच्या विद्याध्यर्थ्यांना एकत्रित बसवून धडे देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या या शाळा दुर्गम भागातील आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून ही रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलूनदेखील शासनाने ती न भरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात एकूण 1069 शाळा आणि या शाळांमध्ये 86 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
हिंदी भाषेत कुशल आहात? ट्रान्स्लेटर पदासाठी करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षण विभागात एकूण 3874 पदे मंजूर असून, यापैकी 3357 पदे भरली आहेत, तर 517 पदे अद्यापही रिक्त आहेत. 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक कायमस्वरूपी व एक कंत्राटी तत्त्वावरील शिक्षक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी काही जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती. जिल्ह्यात २८५ एकशिक्षकी शाळांमध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील 39, देवरी 48, सालेकसा 44, आमगाव 31, गोरेगाव 30, तिरोडा 30, गोंदिया 48, सडक-अर्जुनी 27 शाळांचा समावेश आहे. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, कार्यरत शिक्षकांवरील ताण वाढला आहे. आता काही दिवसांतच नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा शिक्षकांसाठी जिल्ह्यात ओरड होणार आहे.