अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म-2 भरण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ
मुंबई : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी 26 मे ते 5 जून 2025 हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या कालावधीमध्ये 5 जून 2025 पर्यंत 11,29,924 विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण (भाग 1 व भाग 2) भरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग 1 लॉक केला आहे. तसेच भाग 2 अद्याप भरणे बाकी आहे, किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 7 जून 2025 दुपारी 12.30 वाजेपर्यंत अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग 2 दिलेल्या वेळेत लॉक करावा. अशा विद्यार्थ्यांनी भाग 2 भरून लॉक न केल्यास त्यांना तात्पुरत्या गुणवत्ता यादीसाठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यापूर्वी भाग 2 लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांनी 5 जून 2025 पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेला नाही. तसेच प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग 1 पूर्ण करू शकले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी.
प्रवेश प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in हे पोर्टल असून इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांच्यातर्फे https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C हे अधिकृत व्हॉट्सअप चॅनेल सुरू करण्यात आलेले आहे. या चॅनेल वर आपल्याला सर्व अपडेट दिले जातील, असे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.