फोटो सौजन्य - Social Media
हिंदी तसेच इंग्रजी विषयांमध्ये पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगारसंबंधित एक महत्वाची बातमी आहे. भारत सरकार नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी घेऊन आला आहे. सरकारने याबाबत एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कर्मचारी निवड आयोगाने या भरतीचे आयोजन केले असून उमेदवारांना ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुकांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2025 आहे, तर ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे. अर्जा मध्ये सुधारणा करण्यासाठी 1 ते 2 जुलै 2025 दरम्यान SSC सुधारणा विंडो उपलब्ध करून देणार आहे. पेपर-I म्हणजेच संगणक आधारित परीक्षा 12 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग व संस्थांमध्ये ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर, सीनियर ट्रान्सलेटर आणि सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) अशा ग्रुप ‘B’ वर्गातील गैर-राजपत्रित पदांवर भरती होणार आहे.
या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाईल. पहिला टप्पा म्हणजे पेपर-I (CBT) आणि दुसरा टप्पा म्हणजे पेपर-II (वर्णनात्मक परीक्षा). पेपर-I च्या गुणांच्या आधारे उमेदवारांची श्रेणीनुसार निवड होईल आणि त्यानंतरच त्यांना पेपर-II मध्ये बसण्याची संधी मिळेल. पेपर-I मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग करण्यात येईल.
अर्ज शुल्क सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ₹100 ठेवण्यात आले आहे, तर महिला उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. शुल्काचे भरणे केवळ BHIM UPI, नेट बँकिंग, VISA, मास्टरकार्ड, Maestro किंवा RuPay डेबिट कार्ड यांचा वापर करून ऑनलाइन पद्धतीनेच करता येईल. अर्जातील सुधारणा करताना देखील याच पद्धतीने शुल्क भरावे लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत अधिसूचना दोन्ही SSC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ssc.gov.in या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.