राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.
नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे नागपूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे शेजारच्या अमरावती जिल्ह्याचेही पालकत्व असेल. सहा वर्षानंतर बावनकुळे हे पुन्हा नागपूरचे पालकमंत्री झाले आहेत. 2014 ते 2019 या पाच वर्षाचा काळात ते नागपूरचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडे पालकमंत्री येण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले व राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यानंतर चौथ्या क्रमांकाचे वजनदार मंत्री असलेले बावनकुळे यांच्याकडे महसूलसारखे मोठे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविले. लोकसभेत पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत फडणवीसांना साथ देत अवघे राज्य पिंजून काढले होते. पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी येणार असे मानले जात होते.
अमरावतीचीही जबाबदारी
अमरावती जिल्हयातून मंत्रिमंडळात कुणाचाही समावेश नाही. त्यामुळे अमरावतीचे पालकमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी वऱ्हाड प्रांतात मोठा दांडगा जनसंपर्क निर्माण केला. महसूल मंत्री म्हणूनही प्रशासनावर ते नजर ठेवून विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा अमरावतीकरांना आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्यापेक्षा अनुभवी मंत्री
राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्यापेक्षा अनुभवी मंत्री असतानाही फडणवीस यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देत महसूलसारखे मोठे खाते दिले. यापूर्वी ऊर्जामंत्री असतानाही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. प्रशासनावर वचक असणारा आणि कायम कामात व्यस्त असणारे मंत्री म्हणून बावनकुळेंची ओळख आहे.
नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असल्याने त्यांच्याशिवाय दुसरे नाव नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव जाहीर झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 2014 ते 2019 मध्ये बावनकुळे यांनी पालकमंत्री म्हणून जोरदार बॅटींग केली होती. प्रशासनाला कामाला लावले होते.
जयस्वाल गडचिरोलीचे सहपालकमंत्री
वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख असतानाही गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले. यापुवींच त्यांनी तसे संकेत दिले होते. परंतु, कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री हे कुठल्याही जिल्हयाचे पालकमंत्री राहत नाही. मात्र, ही परंपरा फडणवीस यांनी खंडीत केली. नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्हयाला विकासाच्या रांगेत अग्रक्रमी करण्यासाठीची त्यांची धडपड यानिमित्ताने पुढे आली आहे.