फोटो सौजन्य AI
राज्य सरकारने उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के पाणी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यातही १० टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसामुळे तोतलाडोह आणि कन्हान येथील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील पाणी उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे.
Nagpur News : बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू
नागपूर शहराला तोतलाडोह आणि कन्हान नदीतून दररोज सुमारे ७४० एमएलडी कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यातील जवळपास ३५ टक्के म्हणजेच २५९ एमएलडी पाणी गळती, चोरी, अवैध नळजोडण्या आणि बिलिंगमधील त्रुटींमुळे वाया जात असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि अवैध नळजोडण्या नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपाययोजनांतून दररोज ५० एमएलडी पाण्याची बचत होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
शहरात १० टक्के पाणीकपात लागू झाल्यास दररोजच्या पाणीपुरवठ्यात ७४ एमएलडीची घट होणार आहे. आधीच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असताना ही कपात नागरिकांसाठी अडचणीची ठरू शकते. महापौर नीता ठाकरे यांनीही पाणीकपातीचा निर्णय आता अनिवार्य झाल्याचे स्पष्ट केले आहे.
शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे परिस्थितीचा आढावा घेणार असून कपातीचे नेमके प्रमाण निश्चित करण्यासाठी सविस्तर अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागपूरकरांचे लक्ष आता महापालिका आणि राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.






