Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; 'या' गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, सौजन्य : आयएएनएस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गडचिरोली जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांचे अभिनंदन केले. नीती आयोगाच्या (Niti Aayog) एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीतील ‘डेल्टा रँकिंग’मध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशभरात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
ही तिमाही क्रमवारी नीती आयोगाच्या ‘एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम’ अंतर्गत केली जाते. यामध्ये मानवी विकासाशी संबंधित प्रमुख निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाते. गडचिरोलीने देशभरात अव्वल स्थान मिळवले असून, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय जलसंधारण, आरोग्यसेवा, मुलींचे शिक्षण आणि औद्योगिक कौशल्य विकासासह विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीला दिले.
जिल्ह्याच्या अव्वल कामगिरीमागे संरचनात्मक सुधारणा आणि सरकारच्या लक्ष्यित उपाययोजनांची महत्त्वाची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जलसंधारणाच्या विविध योजनांअंतर्गत, विशेषतः पुनरुज्जीवित जलयुक्त शिवार अभियान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक जलसाठवण संरचना उभारण्यात आल्या. त्यामुळे भूजल पातळीत सुधारणा झाली असून कृषी उत्पादन आणि ग्रामीण भागातील पाणी सुरक्षेलाही चालना मिळाली आहे.
दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा वाढवण्यात आली. यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास तसेच स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यास मदत झाली. आधारशी जोडलेल्या बँक खात्यांच्या प्रमाणीकरणालाही मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली. त्यामुळे थेट लाभ हस्तांतरणाची (डीबीटी) प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला बळ मिळाले आहे.
गडचिरोलीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) महिंद्रा, लॉयड्स आणि टाटा ट्रस्ट्स यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्याने प्रगत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लक्ष्यित सुधारणा करण्यात आल्या असून गर्भवती महिलांसाठी पोषण कार्यक्रम राबवण्यात आले.
सायंकाळी दुचाकीवरून निघाला अन् अचानक गायब! तीन रिक्षा-कारच्या रहस्याचा पोलिसांनी लावला छडा
या यशामागील सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करताना फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था, खासगी भागीदार आणि गडचिरोलीतील नागरिकांच्या समन्वित प्रयत्नांचे अभिनंदन केले. मर्पित प्रशासन, कॉर्पोरेट भागीदारी आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून मोठी उद्दिष्टे साध्य करता येतात. गडचिरोलीचे नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये अव्वल स्थान हे त्याचे उदाहरण आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली अव्वल ठरल्याची ही कामगिरी अशा वेळी झाली आहे, जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीला भारतातील प्रमुख ‘ग्रीन स्टील हब’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. माओवादी हिंसाचार आणि मागासलेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यासाठी हा मोठा बदल मानला जात आहे.
गडचिरोलीतील मुबलक खनिजसंपत्तीचा उल्लेख करताना फडणवीस यांनी उच्च दर्जाचे लोहखनिज, मँगनीज आणि चुनखडी उपलब्ध असल्याचे सांगितले. पर्यावरणपूरक आणि कमी प्रदूषण करणाऱ्या स्टील उत्पादनाच्या क्षेत्रात गडचिरोली देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






